Monday, October 19, 2015

मुंबई लोकल...


गाडी प्लैटफॉर्मवर आली तशी माश्याची टोपली डोक्यावर घेतलेले चारपाच भैय्ये लगेजच्या डब्यातून जिन्याकडे धावले..पलिकडची लोकल पकडायला... टोपलीतली सुरमईची शेपटी आणि बोंबलाची जोडी त्याच्या प्रत्येक चढाईनिशी अधिकच वर येत होती हे माझ्यासकट त्या पत्र्यावर बसलेल्या कावळ्यांच्या नजरेत एव्हाना फोकस झालं होतं...
गर्दीतनं वाट काढत तो भैय्या कसाबसा त्या पुलावर आला...आता फक्त कावळ्यांना त्यांच्या नेहमीच्या नियमानुसार झडप घालुन बोंबिल लांबवण्याचा कार्यक्रम लोकांच्या नदेखत उरकायचा होता......गर्दीतनं वाट काढत तो भैय्या कसाबसा त्या पुलावर आला...आता फक्त कावळ्यांना त्यांच्या नेहमीच्या नियमानुसार झडप घालुन बोंबिल लांबवण्याचा कार्यक्रम लोकांच्या नदेखत उरकायचा होता......


इकडे कावळ्यांनी पोजीशन घेताच मीही जरा माझा अँगल त्या दिशेनं वळवणार तोच दोघांनी झडप घातली आणि बोंबिल लांबवली तेवढ्यातच त्या भैय्याच्या मागुन चालणार्या स्लिवलेसचा पंजाबी ड्रेस घातलेल्या सडपातळ पोरिनं साप पहाव तशी जोरात किंचाळी मारली आणि गर्दी थांबली...


(पुढच्या सिनमधे कावळा आणि भैय्या नाहीऐत)

रागाने शाप लालबुंद झालेला तीचा गोरा चेहरा मला त्या गर्दीतही उठुन दिसला आणि
ती माझीच कोणतरी असल्याचा अविर्भावात दोघातिघांना तुडवत मी तिच्या एक्ज्याट बाजुला जाऊन उभा राहीलो...
दोन पस्तीशीतल्या सोशलबायका आणि एक तीच्याच वयाची तीची "लोकलमेट" तीला सावरत होती...
काय झालं ते एव्हाना मला कळलं होत पण मैटर आपल्या हाताच्या बाहेर होता म्हणून आपण हात घालायच्या आत त्यातला एका काकुंनी तीच्या त्या कुरळ्या केसांच्या झुपक्यातुन कोलंबीच small version "करदी" चिमटीत पकडुन तीच्या समोर धरताच ती परत बोंबटली...

"औह शीट व्हाट ईज धिस???"

मला हाच "मौका" वाटला...

"धिस इज prawns मैम"...!

"ओह... आय नो दैट बट दीस डर्टी वाटर स्प्रेडींग on माय हेअर and आयम "व्हेजीटेरीयन" उँss"

(इथे मला त्या जैन आणि गुज्जुंची जिरवल्यागत वाटुन... हसु येत असतानाही मी खुप कंट्रोल केलं)

मग त्यातल्याच दोघींनी पर्समधुन पाण्याच्या बाटल्या काढुन तिथेच तीच्या केसावरुन ओतु लागल्या...तसा माझाही हात बैगेतल्या बाटलीकडे गेला होता पण ती रिकामी असल्याचं जाणवताच मी तो परत काढुन घेत तीच्या ओल्या केसांकडे पाहु लागलो...
किंचीतसे पाणावलेले तीचे डोळे त्या काजळालाही वाट मोकळी करुन देत होते आणि समोर असलेल्या गर्दीमुळे कापत असलेले तीचे हात बघुन मला जरा तीची दया आली खरी पण तो तेवढा एक क्षण नैसर्गिक समजुन कावळ्याच्या टायमींगला मनातनंच एक सैल्यूट ठोकत मी सिनमधे नुकतीच इंट्री मारलेल्या बघ्यांना स्टोरी मीठ मसाला चढवून सांगु लागलो...मग दोन खाकीतले समोरुन येताना दिसताच मीही तिथुन कल्टी मारली...!

Wednesday, October 14, 2015



परतीची मुंबई लोकल....!


त्याने पहीलं "म" वरुन शिवी दिली मग ह्याने त्याचा "भ" काढला...मग दोघांनाही ओळखणार्या त्यांच्याच एका मित्राने तोंड गोलकरुन "च" वरुन शिवी दिली दोघांनाही...दोघांपैकी कोणाचीही साईड नघेता....

तरीही त्यांच "भचम-भचम" चालु आहे....




तिकडे त्या कोपर्यात मेंढीकोटाचा डाव रंगलाय... मेंढ्याची युती (चौकट आणि बदाम) आणि कोट घेण्याची आघाड़ी आज कोण घेणार ह्यातल्या सट्टेबाजीला उत आलाय तिकडेही "भ" आणि "म"चा गजर हाय...


तर दुसरीकडे कोणीतरी हबवर आलेल्या डबलसीट पिक्चरची मागणी करतोय... मग प्रिंट तपासली जातेय...फोर्थ सिटवरचा किश्या दरवाजात लटकणार्या बशीर सोबत "डबलसीट" शेअरतोय..शेरीट्टवर...

बशीरच्या मागे लटकणारा... रवी लगेचच बशीरची खेचायला सुरु करतो.. "क्या बशीर भाय आज वैनी को डबलसीट घरपैच दिखायगा क्या"

बशीर परत त्याला "च" वरुन शिवी घालत म्हणतोय... घरपैच तो क्या "मराठी पिक्चर हैना तो घरपैच"...





सकाळचे "पंचवीस हजार" वोल्टेजच्या प्रवाहातले वारकरी..."पंधराशे" वर येवुन आता हळु-हळु डिम होऊ लागलेत...!


एक जाड भिंगाचा चष्मा घातलेला हाफ सेंचुरी पार केलेल्या काकांना पेपर वाचता वाचता मधेच डुलकी लागलीए...आता त्या काकांचा "मुंबई चौफेर" डब्यात चौफेर फिरतोय...

दरवाजात लटकणार्यांना दुसर्या गाडीतल्या लेडीज डब्याकडे बघुन...Feeling सलमान किंवा शाहरुख असल्याचा क्षणिक भास होतोय...काही लगेच केसावरुन हात फिरवताहेत तर काहींच्या माना 180 अंशात वळल्याहैत...


हाफिसातलं राजकारण आणि महीनाअखेरीस लागलेलं "कडकीचं" ग्रहण गर्दीतल्या चेहर्यांवर स्टेशन बाय स्टेशन वाढत चाल्लए...!


ह्या परतीच्या लोकलमधे काहींच्या स्क्रीनवर कँडी "क्रश" होतेय...!

तर प्रत्येक स्टेशननंतर गाडीत अधिकच "रश" होतेय...!!


...जोशीकाका


आज आमच्या इथल्या जोशीकाकांच्या नातवाचं बारसं...जोशी काका MTNL मधुन रिटायर्ड झालेत...आणि घरीच असतात ... अधनंमधनं जायचे शाखेत पण सध्या तेही बंद करुन घरीच पेपर वाचताना दिसतात...ती हाफ चड्डी चढवतात अधनंमधनं टिव्हीवर बातम्या सुरु झाल्या की....

तर सांगायचं असं की गेल्या दोन दिवसापासुन जोशींच्या घरातनं भांडण्याचे आवाज येत होते... आणि आज नातवाचं बारसं... तरी घरात नुसतं सामसुम...काय कसला साऊंड नाय की कसला मंडप-बिंडप.... मग नरहाउन खबर काढायला म्हणून जोशींच्या खास मित्राकडे आमचे पिताश्री गेले...ऐव्हाना व्हाट्सपवरच्या ऐरीयातल्या ग्रुपवर जोश्यांच्या पोस्टी झळकु लागल्यात...

त्याच झालं असं... जोशीकाकांना आपल्या नातवाचं नाव ठेवायचय "नरेंद्र" पण सुनबाईंचा नरेंद्राला इरोध... नरेंद्राला म्हणजे... नरेंद्र ह्या नावाला... जोशीकाका तर हट्टालाच पेटलेत लेकाच्या मागे... नाव ठेवायचं तर नरेंद्रच नाय तर खाली करा हे घर असं बजावूनच ठेवलं परवा......तेव्हापासुन आज... आता बारसं दोनएक तासावर येवुन ठेपलं तरीपण सुनबाईंचा इरोध काय कमी होईना आणि आतातर सुनबाईंसोबत माहेरची सर्व मंडळी बी पंगतीला हजर झालीत जोश्यांच्या दा बाय दा फुटाच्या वाड्यावर....त्यांच्याकडच्या मंडळींच्या नावाचा चाईस ऐकुन तर जोश्यांच हार्ट फेल व्हायचंच बाकी होतं पण ते नाव अजुनतरी जोश्यांच्या कानावर गेलं नसाव की काय म्हणुन जोशी नुकतेच मला सार्वजनिक संडासातुन बाहेर येताना दिसले... रिलैक्स वाटत होते पण त्यातही जरा ताव होता... म्हणुन मी लांबुनच हाक मारली "कायssss जोशीकाका...मग काय नाव ठरलं?"..तर त्यांनी ती उजव्या हातातली बादली माझ्याकडे रोखली आणि म्हटले ये संध्याकाळी सामोसे देतो तुला...! त्यांची ती आमंत्रण द्यायची जागा आणि ती हातातली हँडल तुटलेली बादली बघुन... मनात नसतानाही मी "हो हो" म्हणत ते अजुन काही बोलायच्या आत मी तिथुन कल्टी मारली... आणि हा समोश्याचा मेनुचा लेटेस्ट अपडेट त्या व्हाट्सपवरच्या चांडाळांना दिला...!झालं तर...

ऐव्हाना हळु-हळु सगळे चाळीतले जोशांच्या गैलरीत जमु लागलेत....नावाचं सिरीयस मैटर काय शमल्याचं अजुनतरी जोशी काकुंच्या बाडीलैगवेजवरुन दिसत नव्हतं...सर्व घरचीच मंडळी आणि थोडे बिनकामी अतिउत्साही चाळकरी असे मिळुन पाच-पंचवीस पाहुने.... त्यातही दोन पार्ट्या एक नरेंद्र नावाला इरोध असणारी सुनबाईंच्या माहेरकडची तर दुसरी जोशांची...अजुनतरी समोरच्या पार्टीच नाव काय फुटत नव्हतं.... मी मात्र जोशीपंतांच्याच बाजुने होतो...सामोश्यांचा करार होता ना... तो करार झाल्यावर मग आपण पार्टी चेंज करण्याच्या विचारातच होतो तर...सुनबाईंचा भाऊ माझ्या शेजारी येवुन उभा... मग मी पण असाच सोडतोय व्हय त्याला...टाकला त्याच्या खांद्यावर हात आणिघेतला त्याला साईडला...मग जाऊन कळलं का सुनबाईंचा नरेंद्राला इरोध का ते... त्याच झालं असं की सुनबाईंना "राहुल" खुपच प्रिय...गांधीचा नव्हे हा... "महाजनांचा राहुल"... हो!.तोच जो मध्यंतरी टिव्हीवर दिसायचा खिदडत-खिदडत...तसा आपला जोश्यांचा लेक दिसायला राहुल वानीच.. गोरा गोरा उंच...मग आमच्या पिताश्रींना हे माझ्याकडून कळल्यावर...

आमच्या पिताश्रींनीच पंतांकडे जाऊन वादावर ताडपत्री घातली राहुल नाव घरात म्हणायला तर नरेंद्र शाळेत व पेपरावर असा करार दोन्ही पार्टींत झाला.....इरोध मावळला... बारसं झालं..!पण गंमत म्हणजे आजही जोश्या लाडाने नातवाला राहुल म्हणुनच हाक मारतो...!पण जरा सासु-सुनेचं वाजलं की पंतांच्या तोंडी नरेंद्र अवतरतो...!!
31 July 2015

"मी आणि शाहीर साबळे" हा कार्यक्रम आज ठाण्याच्या गडकरीत पाहीला... केदार शिंदे, संतोष पवार आणि भरत जाधव ह्यांनी लोकनाट्यकला आज परत जिवंत केली रंगमंचावर...फक्त आणि फक्त मराठी माणसासाठी, मराठी भाषा अजुनही बोलणार्यांसाठी मराठी माणूस म्हणून जगण्यासाठी हा कार्यक्रम उर्जा देवुन जातो... हलका फुलका पण मार्मिक विनोद...देशातल्या सद्यपरिस्थितीवरील भाष्य...शाहीरांची अजरामर गाणी... आणि त्यामागचा इतिहास अक्षरशः डोळ्यांच्या पापण्याही लवु देत नाही... भरतची आणि संतोषची दिलखेच अदा आणि केदार शिंदेचा शाहीरी थाटाने हा प्रयोग नक्कीच मला गेल्या काही दिवसांच शीण घालवुन एक तरतरी, एक भन्नाट उर्जा देवुन गेला जीवनातल्या पुढच्या प्रवासासाठी...
उद्या ह्याचा दुसरा प्रयोग आपल्या नवीमुंबईत... वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यग्रुहात आहे तर हा कार्यक्रम नक्की बघा 
ह्या कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या प्रत्येक कलाकाराला पुढच्या दोन प्रयोगांसाठी मनापासून शुभेच्छा...!!!

मी_आणि_शाहीर_साबळे